कैकोलन— एक कोष्टी जात
विभाग अकरावा : काव्य - खतें कैकोलन— एक कोष्टी जात. यांची एकंदर लो.सं. (१९११) ३७३२९७ आहे. बहुतेक मद्रास इलाख्यांतच आहेत. तेलगू प्रांतांत व दक्षिणेकडील सर्व जिल्ह्यांत कैकोलन जातीचे तामीळ कोष्टी राहात असून ते तेलगू भाषाच बोलतात. अशी एक दंतकथा आहे कीं, मदुरेच्या नायक राजांनां कैकोलनांचें काम पसंत न पडल्यामुळें त्यांनीं उत्तरेकडून पटनूलकारन कोष्टी आणविले; व त्यांचीच संख्या पुढें जास्त झाली. संस्कृत वीरबाहु शब्दाचा समानार्थी तामीळ शब्द कैकोलन असा आहे व वीरबाहु हाच आपला मूळ पुरुष होय अशी या जातीची समजूत आहे. कैकोलन लोकांनां सेनगुंडार म्हणजे रक्तखंजीर असें म्हणतात. व त्याविषयीं दंतकथाहि आहेत. कै म्हणजे हात व कोल म्हणजे घोटा, अशी कैकोलनची व्युत्पत्ति आहे. हातमागाच्या विविध भागांनां हे लोक देवता व ऋषी समजतात. धागा हा विष्णूच्या नाभिकमलांतून प्रथम उत्पन्न झाला, बाणा म्हणजे एक देवता, ताणा म्हणजे नारद, पावटी हा वेदमुनि, फलक म्हणजेच ब्रह्म आणि ताणा बांधण्याचा मुख्य दोर म्हणजे आदिशेष होय. अशा तर्हेच्या श्रद्धामय कल्पना मागाविषयीं कैकोलन कोष्ट्यांच्या आह...